IPS-sandeep-ghuge
अकोला

अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक-पोलीस अधीक्षक संदीप घुगे 

जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीची बैठक

अकोला : जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा,असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले.

केंद्र शासनातर्फे जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समिती स्थापित करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी ही समिती काम करते. या समितीची बैठक आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. भावना हाडोळे, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त एस.पी. बैस, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संजय राठोड, कृषी विभागाच्या ज्योती चोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहायक डाक अधीक्षक सुनिल हिवराळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात गांजाबाबत ३५ गुन्हे दाखल त्यात ३७ व्यक्तिंना अटक

जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. प्रतिबंधित पिकांची लागवड होत असल्यास त्यावर कारवाई करणे. अंमली पदार्थांची वाहतुक रोखणे यासाठी संयुक्त कारवाई होणे अपेक्षित आहे. याबाबत गुप्त माहिती घेऊन प्रतिबंध करणे, ही उपाययोजना करीत असतांना समाजात जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनते विरोधात प्रबोधन करावे. शाळा महाविद्यालयांसारख्या ठिकाणी अधिक प्रबोधन होणे आवश्यक आहे,असे पोलीस अधीक्षक घुगे यांनी सांगितले.

जिल्ह्यात रासायनिक पदार्थ निर्मिती कारखान्यांमध्ये अंमली वा प्रतिबंधित पदार्थांची निर्मिती होत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करुन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अंमलीपदार्थ संदर्भातील कारवाई व दाखल गुन्ह्यांची माहितीही यावेळी सादर करण्यात आली. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यात गांजाबाबत ३५ गुन्हे दाखल झाले. त्यात ३७ व्यक्तिंना अटक झाली.

आतापर्यंत २४३ किलो ३९४ ग्रॅम मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १८ लाख १४ हजार ६० रुपये इतकी आहे. तर अफू प्रकरणी एक गुन्हा दाखल असून दोघांना अटक झाली आहे. आतापर्यंत ८९० ग्रॅम मुद्देमाल जप्त असून त्याची किंमत ८ हजार रुपये इतकी आहे. सन २०२३ मध्ये दि.२५ फेब्रुवारी अखेर गांजा प्रकरणी एक गुन्हा दाखल असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमाल ५ किलो ९८० ग्रॅम असून त्याची किंमत ५९ हजार ८०० रुपये इतकी आहे,

अशी माहिती यावेळी देण्यात आली.देशाचे भविष्य असणार्‍या युवापिढीला व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवावे, त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा. संशयास्पद स्थळांची पाहणी करावी. वाहतुकीवर नजर ठेवावी,असे निर्देश यावेळी देण्यात आले. अंमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तिंवर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करुन त्यांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.