क्राईम

सदानंद कदम यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर

रत्नागिरी  :  शिवसेना नेते अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेले केबल व्यावसायिक सदानंद कदम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला. गेल्या वर्षी १० मार्च रोजी त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून गेले ११ महिने ते अटकेत होते.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनिल परब यांच्या मुरुड मधील साई रिसोर्टची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावरही इडीने गुन्हा दाखल केला होता. २०२० मध्ये साई रिसॉर्टची जामीन सदानंद कदम यांनी घेतली होती. या जमिनीच्या खरेदी-विक्रीत मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप सदानंद कदम यांच्यावर आहे. या प्रकरणी इडीने सदानंद कदम यांची ६ तास चौकशी करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर कदम यांनी सुरुवातीला कनिष्ट न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होते. पण त्यांचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तिथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन आज त्यांना जामीन मंजूर झाला. कदम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या खेडमधील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.