ताज्या बातम्या पुणे

पुण्यात २० फेब्रुवारीपासून ओला, उबरची सेवा बंद

पुणे :  २० फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २० फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन सुरु होणार आहे. कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हाधिका-यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप आहे. त्यामुळे येत्या २० फेब्रुवारीपासून पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. १ जानेवारी २०२४ पासून नवीन दर लागू झालेत. मात्र, ओला, उबेर यासारख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाही. परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणा-या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणा-या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, आणि निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे १२ हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.