क्रीडा

को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन क्रिकेट स्पर्धेत

हिंदुस्तान, रत्नागिरी बँक उपांत्य फेरीत

मुंबई : को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरंदरे स्टेडीयममध्ये सुरु असलेल्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान बँकने म्युनिसिपल बँकेचे ३७ धावांचे आव्हान पार करून ८ विकेटने विजय संपादन केला आणि उपांत्य फेरी गाठली. हिंदुस्तान बँकेला जिंकण्यासाठी अनिकेत वाघची ३ षटकारासह २५ धावांची आक्रमक फलंदाजी उपयुक्त ठरली. चंद्रकांत घाणेकरच्या नाबाद ४ षटकारांच्या आतषबाजीमुळे रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकने जी.एस. महानगर बँकेचे ४४ धावांचे आव्हान ८ विकेटने संपुष्टात आणून उपांत्यपूर्व फेरी जिंकली.
तत्पूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये एनकेजीएसबी बँकेच्या ३६ धावांना यशस्वी प्रत्युत्तर देतांना रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक संघाने ४ विकेटच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. मंत्रालय सहकारी बँकेच्या ३६ धावांचा पाठलाग करतांना जीएस महानगर बँकेने ८ गडी राखुन सहज विजय मिळविला. ठाणे भारत सहकारी बँकेने कुणबी सहकारी बँकेविरुध्द प्रथम फलंदाजी करुन १ बाद ६० धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरादाखल कुणबी बँकेला ३ बाद ४० धावसंख्येपर्यंत मजल गाठता आली. परिणामी ठाणे भारत सहकारी बँकेने २० धावांनी मोठा विजय मिळविला. सिटी बँकेला ५ बाद १७ धावांवर रोखून म्युनिसिपल बँकेने ९ विकेटने शानदार विजय मिळविला.