ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर : गोरेवाडात आढळली 156 जिवंत काडतुसे

नक्षलवादी कनेक्शनच्या दिशेने तपासाला गती

नागपूर, 09 डिसेंबर : नागपूर शहरालगतच्या गोरोवाडा जंगल परिसरात आज, शनिवारी 156 जिवंत काडतुसे आढळून आलीत. ही काडतुसे एसएलआर रायफलची असून सुमारे 32 वर्ष जुनी आहेत. याप्रकरणी उच्च पातळीवरून तपास सुरू झाला असून नक्षलवादी कनेक्शनच्या दिशेने पोलिस तपासाने दिशा पकडली आहे.

नागपूर- काटोल मार्गावर गोरेवाडा जंगल परिसर आहे. शनिवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती लघुशंकेसाठी गेली असता त्याची नजर नाल्याजवळ असलेल्या एका पिशवीवर पडली. त्यात त्याला काडतुसे दिसली. त्याने लगेच गिट्टीखदान पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या पथकाने येऊन तपासणी केली असता त्या बॅगमध्ये 156 जिवंत काडतुसे आढळून आली. लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर फॉरेन्सिक टीम, बॉम्ब शोधक आणि डिस्पोजल टीमसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या बीडीडीएस पथकाने कुत्र्यांच्या मदतीने परिसराची तपासणी केली. यानंतर पोलिसांनी गोळ्या जप्त केल्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या गोळ्या खूप जुन्या आहेत. या गोळ्यांचा उपयोग एसएलआर रायफलमध्ये होत असून ही बंदूक फक्त पोलिस आणि निमलष्करी दल वापरते. घटनास्थळापासून शहर पोलिस मुख्यालय काही अंतरावर आहे. पोलिस जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहेत. प्रारंभिक तपासात ही काडतुसे 1991 सालची असल्याचे निष्पन्न झाले. इसकी जुनी काडतुसे या परिसरात कशी आली याचा शोध सुरू आहे. याबाबतची सर्व माहिती एटीएस व इतर तपास यंत्रणांना देण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या गोळ्या नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्षलवाद्यांनी अनेकदा सरकारी शस्त्रे लुटून त्यांचा वापर केला आहे. नक्षलवादी कारवाया आणि त्यांच्या समर्थकांबाबत नागपूर नेहमीच चर्चेत असते. याच गोरेवाडा परिसरात दीड दशकापूर्वी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र साठा सापडला होता. हा कारखाना बराच काळ सुरू होता. मोमीनपुरा येथून सुरू असलेल्या आंतरराज्यीय शस्त्र रॅकेटचा काही आठवड्यांपूर्वी भंडाफोड झाला होता. यापार्श्वभूमीवर सदर घटनेचे गांभीर्य अनेक पटीने वाढले आहे. नागपुरात सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे पोलिसांसोबतच एटीएस आणि इतर गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.