ताज्या बातम्या

क्षीरसागरांवर गुन्हा दाखल न केल्याने दानवेंनी पोलीस अधीक्षकांना खडसावले

कोल्हापूर : मारहाणीप्रकरणी राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनंतरही शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही, राजेश क्षीरसागर कोण आहे, गुन्हा का नोंदवला नाही, लगेच कारवाई झाली पाहिजे, पोलिसांची आणि क्षीरसागरांची मस्ती चालणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोबाईलवरुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना गुरुवारी खडसावले.
कोल्हापुरातील एका सहकारी सोसायटीत राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे राहतात. सोसायटीतील वादातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी अद्यापही क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने राजेंद्र वरपे यांनी दानवे यांच्या कोल्हापूरातील जनता दरबारात दाद मागितली. वरपे यांचे म्हणणे एकूण घेत दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन केला. क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, त्याच्या बापाची जहागीर आहे का, तुम्ही पोलीस त्यांना संरक्षण देता, कोणतेही कलम लावा, पण गुन्हा दाखल करा, पोलिसांची आणि क्षीरसागरची मस्ती चालणार नाही. अन्यथा येत्या अधिवेशनात तुमच्याविरोधातच आवाज उठवतो अशी तंबीच दानवे यांनी मोबाईलवरुन पंडित यांना दिली. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे तत्काळ जनता दरबारात दाखल झाले. दानवे यांनी टिके यांना राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राजेश क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक दानवेंच्या गाड्याचा ताफा अडवण्यासाठी रस्त्यावर उभे होते.