क्रीडा

आत्माराम मोरे शालेय कबड्डी: समता वि. माणेकलाल आज अंतिम लढत

मुंबई : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी समता विद्यामंदिर-असल्फा विरुध्द माणेकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल-घाटकोपर यामध्ये अंतिम लढत १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वा. होईल. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे घाटकोपर-पश्चिम येथील माणेकलाल ग्राउंडमध्ये अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा विरुध्द ताराबाई मोडक हायस्कूल-दादर यामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी सामना तत्पूर्वी होईल. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
आत्माराम मोरे स्मृती शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेमधील उपांत्य सामना ताराबाई मोडक हायस्कूलचा अनिश पालेकर विरुध्द माणेकलाल मेहता स्कूलचा सामनावीर कुलदीप सिंग असा रंगला. पहिल्या डावातील २६-१४ अशा मोठ्या आघाडीचा लाभ उठवीत माणेकलाल स्कूलने ५१-३९ असा विजय संपादन करीत अंतिम फेरी गाठली. सामनावीर वेद सावंतच्या अष्टपैलू खेळामुळे समता विद्यामंदिरने निर्णायक फेरीत धडक देतांना डिसोझा हायस्कूलचा ६८-३५ असा पराभव केला. समता शाळेने मध्यंतरालाच ३७-११ अशी मोठी आघाडी घेतली होती. स्पर्धे दरम्यान शालेय खेळाडूंना प्रशिक्षक सुनील खोपकर, अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले होते.