राजकीय

अशोक चव्हाण आता भाजपाचे “आदर्श”

माझी पुढील वाटचालीची भूमिका दोन दिवसांनंतरच स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसचा हात सोडला. ते काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. राज्यातील भाजपाच्या नेत्यांनीही अनेकदा उघडपणे तसे बोलून दाखवले होते.
अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर आता अशोक चव्हाण 15 फेब्रुवारीला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपाप्रवेश होणार आहे. भाजपामध्ये गेल्यावर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी किंवा केंद्रातही मोठे पद दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर मुंबईतील आदर्श सोसायटीचे अर्धा डझन फ्लॅट आपल्या नातलगांना दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात सीबीआय कारवाईची मागणी केली होती. या तिघांच्या भाषणांचे व्हिडिओ आज व्हायरल झाले होते. भाजपाकडून इतके आरोप झालेले अशोक चव्हाण आता भाजपात जाऊन स्वच्छ होणार का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
भाजपात जाण्यासाठी अशोक चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. त्यात केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात त्यांचा वाजतगाजत प्रवेश होईल.

अशोक चव्हाण आपल्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आज विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा आणि विधिमंडळ काँग्रेसच्या सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी प्रामाणिकपणे काम केले. माझी कोणाही विरुद्ध तक्रार किंवा वेगळी भावना नाही. पक्षांतर्गत गोष्टींची जाहीर वाच्यता किंवा उणीदुणी काढण्याचा माझा स्वभाव नाही. काँग्रेसने मला मोठे केले, तसे मीही काँग्रेसला मोठे केले. पक्षाचा राजीनामा देणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. याबाबत मी कोणत्याही आमदारांशी, सहकार्‍यांशी चर्चा केली नाही. काँग्रेस सोडण्याचे कारण काय, असे विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचे कारण असलेच पाहिजे असे नाही. मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो. त्यामुळे आता वेगळा विचार करायची वेळ आली आहे, असे वाटते. काँग्रेस सोडल्यावर मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. यासाठी मला वेळ हवा. माझी पुढची वाटचाल मी दोन दिवसांनंतरच स्पष्ट बोलेल.