49 Guptis, 30 Katyars, 6 Knives seized during Salbardi Yatra
अमरावती क्राईम

सालबर्डी यात्रेत विक्रीसाठी आलेल्या 49 गुप्ती, 30 कट्यार, 6 चाकू जप्त

अमरावती, 18 फेब्रुवारी :  मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे सध्या यात्रा भरली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येत भाविक येतात. दरम्यान याच यात्रेत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्र आल्याची माहिती ग्रामिण पोलिसांच्या एलसीबीला मिळाली होती.

पोलिसांनी माहितीच्या आधारे शस्त्र विक्रेत्याचा शोध घेवून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडून तब्बल 49 गुप्ती, 30 कट्यार, सहा रामपूरी चाकू असा साठा मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे. लपून छपून याची विक्री यात्रेदरम्यान कऱण्यात येत होती

सालबर्डी यात्रेत ईश्वरसिंग बावरी (20, रा. तळेगाव श्यामजीपंत, वर्धा) हा शस्त्र विक्रीसाठी घेवून आला होता. त्याला पोलिसांनी पकडले आहे. एलसीबीचे पथक यात्रेत गस्तीवर असताना त्यांना शस्त्र विक्रीची माहीती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी शोध घेवून बावरीला गाठले.

त्यावेळी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळून आला. यावेळी शस्त्र विकण्याची कोणतीही परवानगी त्याच्याकडे नव्हती. तसेच शस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक असलेले लोखंडी हातोडे व एैरण व अन्य साहित्य सुध्दा पोलिसांना मिळाले आहे.

त्याच्याकडे मिळालेल्या शस्त्रांची किंमत 34 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 18) रात्री एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, मोर्शी ठाणेदार श्रीराम लांबाडे, पीएसआय मुलचंद भांबुरकर, पीएसआय संजय शिंदे या पथकाने केली आहे. जप्त केलेले शस्त्र तसेच आरोपीला मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.