महाराष्ट्र

संजय मारुडकर महानिर्मितीच्या संचालक(संचलन) पदी रुजू

Rajyonnati Bureau

अमरावती १६ फेब्रुवारी २०२३: वीज उत्पादन क्षेत्रातील बहुआयामी,  प्रतिभासंपन्न असे संजय मारुडकर यांची महानिर्मितीचे संचालक (संचलन) म्हणून नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांनी १९८७ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवी प्राप्त केली असून, १९९२ मध्ये नागपूर विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदविका, २००० मध्ये सीईडीटीआय औरंगाबादमधून माहिती तंत्रज्ञान पदविका तसेच राष्ट्रीय उत्पादकता परिषद-ब्यूरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, भारत सरकारचे ते प्रमाणित “ऊर्जा लेखा परीक्षक”देखील आहेत.वीज उत्पादन क्षेत्रातील सुमारे ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असून संचलन-सुव्यवस्था, प्रकल्प, नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख, नूतनीकरण- आधुनिकीकरण, केंद्रीकृत खरेदी, कार्यक्षमता आणि  प्रणाली सुधारणा यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कोराडी ३x६६० मेगावाट प्रकल्पाच्या उभारणी आणि यशस्वी संचलनासाठी त्यांचे लक्षणीय योगदान आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगावाट संचात डिजिटल कंट्रोल सिस्टमचे यशस्वी रेट्रोफिट कमिशनिंग, कोराडी व चंद्रपूर येथे प्रशिक्षणासाठी विक्रमी वेळेत  सिम्युलेटर  उभारण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. खरेदी प्रक्रियेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून  महसुलात लक्षणीय बचत केली असून कोविड-१९ च्या कालावधीत भुसावळ १X६६० मेगावॅट प्रकल्प उभारणीचे काम सुरू ठेवण्यात यश प्राप्त झाले.वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या लक्ष्यानुसार रास्त दरात महत्तम वीज उत्पादन करणे, मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये जास्तीत जास्त संच आणणे, वीज संचांची एकूणच कार्यक्षमता वाढवणे इत्यादी आव्हानांचा सामना करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे पदभार स्वीकारल्यानंतर संजय मारुडकर यांनी संकल्प केला आहे.अमरावती जिल्ह्याचे रहिवाशी असलेले संजय मारुडकर, संयमी, मनमिळावू स्वभाव, तांत्रिक कौशल्य आणि साधेपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू आहेत