अकोला

शिर्डी येथे दि.२४ पासून पशुप्रदर्शन

अकोला : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शिर्डी, ता.राहता, जि. अहमदनगर येथे शुक्रवार दि.२४ ते रविवार दि.२६ मार्च या कालावधीत महा पशुधन एक्स्पो २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे व पशुपालनाविषयी अद्यावत माहिती घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पशु प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील अंदाजे १२७० जातिवंत गाय-म्हैस वर्गीय ,कुक्कुट वर्गीय पक्षी ,अश्व जातीची जनावरे सहभागी होणार आहेत.

सहभागी झालेल्या उत्तम जातिवंत लहान-मोठ्या जनावरांकरिता रोख पारितोषिक असून त्या करिता ४१ लाख रुपयांपर्यंत तरतूद करण्यात आली आहे.पशु प्रदर्शनात शेतकरी,पशुपालक, व्यावसायिक ,नागरिक यांना पशुसंवर्धन विषयाची उपयुक्त शास्त्रोक्त माहिती मिळावी यासाठी विविध स्टॉल्स लावण्यात येत आहे.

चारा पिके,मुरघास, मुक्तसंचार गोठा, अझोला लागवड , निकृष्ठ चारा सकस करणे व खुर साळणी असे विविध बाबींचे प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहे. तज्ज्ञांचे महत्वाच्या पशुसंवर्धन विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पशु- पक्षांना होणारे विविध आजारांवरील रोग नियंत्रण कसे करावे अशा महत्वाच्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीत सहभागी होणार्‍या जनावरांचा वाहतूक विमा, वाहतूक खर्च शासनातर्फे संबधित मालकाला देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष सहभागी होणारे पशुपालक ,शेतकरी ज्यांचे स्टॉल्स राहतील त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था शासना तर्फे करण्यात येत आहे.

सहभागी होणार्‍या जनावरांचा चारा व पाणी शासना तर्फे उपलब्ध केलेली आहे. तसेच प्रदर्शनी ला भेट देणार्‍यांकरिता बचत गटाचे स्टॉल्स, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकरी,नागरिकांनी या महा पशुधन एक्सपो २०२३ पशुप्रदर्शनात सहभागी व्हावे व लाभ घ्यावा ,असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, अकोला चे वतीने करण्यात आले आहे.