अकोला

लाईनमन हा महावितरण व्यवस्थेमधील महत्वाचा घटक- पवनकुमार कछोट

परिमंडलातील महावितरण जनमित्रांचा गौरव

अकोला: जनसामान्यांना लाईनमन म्हणून परिचीत असणारा महावितरणचा जनमित्र हा महावितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठ्यासाठी २४ तास सेवा देतात. त्यांच्या कामाची शासनस्तरावर दखल घेणे ही महावितरणसाठी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब असल्याचे प्रदिपादन अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले.

विद्युत भवन येथे पार पडलेल्या लाईनमन दिनाच्या गौरव संमारंभात ते बोलत होते.यावेळी कार्यकारी अभियंते ग्यानेश पानपाटिल, सुनिल कळमकर,विजयकुमार कासट, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पीपरे,वरिष्ठ व्यवस्थापक सुमित बोधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना पवनकुमार कछोट म्हणाले की,शासनाने जनमित्राच्या कामाची दखल घेणे ही महावितरणसाठी अभिमानाची आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविणारी बाब आहे.

वीज क्षेत्र हे अत्यंत जोखीमेचे आहे. अनावधानाने झालेली चुकही येथे क्षम्य नाही.त्यामुळे वीज यंत्रणेवरची कामे करीत असतांना सुरक्षेशी तडजोड न करण्याचे आवाहन उपस्थित जनमित्रांना केले. महावितरणमधील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिमंडलातील अधीक्षक अभियंता वाशिम मंगेश वैद्य, अधीक्षक अभियंता बुलडाणा बद्रीनाथ जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील मंडल, विभाग, आणि उपविभागीय कार्यालयात विविध उपक्रम घेत ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात आला.यावेळी जवमित्रांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला,त्यांना सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.

रस्ता अपघाताबाबतही माहीती देण्यात आली. यावेळी जनमित्रांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरेंद्र क्षीरसागर,वसंत धर्मे,किशोर धाबेकर रोशन संदुरे,राम शेगोकार,विनोद फुलारी,नेतनकर आदींनी विद्युत भवन येथील कार्यक्रमाचे नियोजनात महत्वाची भूमिका पार पाडली.