मराठवाडा

मराठवाड्यात अवकाळीमुळे ६२,४८० हेक्टर शेती बाधित

छ्त्रपती संभाजीनगर, 19 मार्च :  मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अवकाळीमुळे ६२,४८०. ३० हेक्टर शेती बाधित झाली आहे. तीन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागणी जोर धरत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशावेळी किमान नुकसानभरपाईतरी लवकर मिळावी अशी त्यांना आशा आहे. मात्र संपामुळे यात अडचणी येत आहेत. १ ते १९ मार्च दरम्यान मराठवाड्यात एकूण १६ मिमी अवकाळी पाऊस पडला. गहू, हरभरा व इतर रब्बी पिके जमीनदोस्त झाली.

विभागात या अवकाळीमुळे एकूण ६२ हजार ४८०. ३० हेक्टर शेती बाधित झाली. यात ४२६४४. ७० हेक्टर जिरायती, १६९५५. ८० हेक्टर बागायती तर २८७९. ८० हेक्टर फळबागांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारींना केल्या होत्या. त्यानुसार पंचनाम्याला सुरुवातही झाली. मात्र संपामुळे पंचनामे पूर्ण करण्यात आडकाठी येत आहे.

एकूण बाधित क्षेत्रापैकी १९ मार्चपर्यंत केवळ १३८४ हेक्टररील पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे एकूण बाधित क्षेत्राच्या केवळ २. २२ टक्केच आहे. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील ८५ हजार ३०० शेतकरी बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक २१ हजार ४५९ शेतकरी बीड जिल्ह्यातील आहेत. त्यासोबतच नांदेड १९ हजार ८९९, लातूर १६ हजार ८४२, हिंगोली १३ हजार २८६, छ्त्रपती संभाजीनगर ९ हजार ३१४ आणि परभणी जिल्ह्यातील ४ हजार ५०० शेतकरी बाधित झाले आहेत.