nashik-raod-ast-fire
महाराष्ट्र

बसचालकाच्या सतर्कतेमुळे अग्निकांड टळल

नाशिकरोड,  प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर येथून शिर्डीला जाणाऱ्या बसमधील बॅटरीच्या वायरचे शॉर्टसर्किट झाल्याने अचानक बसच्या काही भागातून धूर निघू लागला. बस पेट घेणार समजताच बसचालकाने सतर्कता दाखवत तातडीने बस थांबवत प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. त्याचवेळी पाठीमागूनच शहर वाहतुकीचे पोलीस येत होते.

त्यांनीही तातडीने मदत करून बसमधील प्रवाशांना उतरवले व त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा नाशिक शहरात पुन्हा एक मोठे बस अग्निकांड झाले असते. याबाबत माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरवरून शिर्डीकडे एमएच 14 बीटी 4117 या क्रमांकाची बस जात होती.

सदरची बस नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर नाक्याजवळ येताच बसच्या बॅटरीमधील वायर लीक झाली व त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. सदरची घटना काही क्षणातच बसचालकाला कळली. त्यानंतर बसचालकाने तातडीने बस थांबविली तसेच पाठीमागून शहर वाहतुकीचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम हे सुद्धा आपल्या वाहनाने येत होते.

त्यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने आपल्या सहकार्यांसमवेत बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर लगेच पाण्याच्या बंबाला पाचारण केले व संपूर्ण बसमध्ये व बाहेर धूर निघत असताना पाण्याचा मारा करून सदर बसची आग विझविली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.