क्राईम

*पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस अंगावर बेतले* आजोबा आणि नातू नदीच्या प्रवाहात वाहून गेले…आजोबांचा मृत्यू

अकोट प्रतिनिधी:-१३सप्टेंबरपुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस दोघांच्या अंगावर बेतले आहे, मोहाळी नदीवरील पूल ओलांडत असताना आजोबा आणि नातू दोघेही जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृत्यूच्या हाती लागलाय तर नातवाचा शोध सुरु आहे. ही घटना अकोट तालुक्यातल्या तांदूळवाडी-सोनबर्डी नदीच्या पुलावर घडली आहे. स्थानिक गावकरी आणि शोध बचाव पथकाकडून नातवाचा शोध सुरू आहे.

*काय आहे संपूर्ण घटना*?

प्रभाकर प्रल्हाद लावणे (वय ६५, राहणार तांदूळवाडी, ता. अकोट) आणि त्यांचा नातू आदित्य विनोद लावणे (वय ११, राहणार तांदूळवाडी, ता. अकोट) हे दोघेही जण आज पहाटे म्हैस घेवून सोनबर्डी गावात गेले होते. दोघे परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर यांचा नातू आदित्य हा नदीच्या प्रवाहात वाहून जात होता, त्याला वाचवण्यासाठी आजोबांना प्रयत्न केले. मात्र तेही देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती तांदूळवाडी गावकऱ्यांना मिळतात, त्यांनी नदीच्या स्थळी भेट दिली. आणि दोघांनाही शोधण्यास सुरुवात केली, या दरम्यान प्रभाकर लावणे यांचा मृतदेह हाती लागलाय. तर नातू आदित्य अजूनही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे. याची माहीती अकोट तहसीलदार निलेश मडके, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, मंडळ अधिकारी प्रशांत साहारे,तलाठी घुगे मॅडम ग्रामसेवक खोरोळे, पोलीस कर्मचारी भास्कर सांगळे,बुंदे दाखल झाले आहेत.

दरम्यान, अकोला जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाला असून त्यामुळे नदी, नाल्यांना पुर आले आहेत. मात्र पुराचे पाणी पुलावरून जात असताना नागरिकांनी पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.दरम्यान, प्रभाकर लावणे यांना एकटा मुलगा असून त्यांनाही आदित्य हा एकटा मुलगा आहे तर आणखी तीन मुली असल्याचे समजते. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांना मोठा धक्का बसलाय. सध्या संपूर्ण कुटुंब नदीच्या स्थळी दाखल झालं आहे.पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू वाहून गेल्यामुळे तांदूळवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तांदूळवाडी सोनबर्डी नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी देखील हा पूल पाण्याखाली जातो. याचे कारण म्हणजे या पुलाची उंचीच खूप कमी आहे. ही स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पाऊस पडल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा. मात्र सोनबर्डी आणि तांदूळवाडी वाहतुकीसाठी हाच एक पर्याय मार्ग असल्याने अनेकदा नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामधून जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच दोघे वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सोनबर्डी आणि तांदूळवाडी या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली असून अद्यापही प्रशासनाने काम सुरू केले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.