James-Anderson
क्रीडा

जेम्स अँडरसनने रचला विक्रम मुथय्या मुरलीधरनला मागे टाकत केला ‘हा` कारनामा

नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे प्रत्येक सामन्यात तो एकतर मोठा पराक्रम करत आहे किंवा विक्रम मोडत आहे. 40 वर्षीय अँडरसनने आता आणखी एक टप्पा गाठला आहे.

कसोटीतील दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या बाबतीत श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे. अँडरसनने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर हा पराक्रम केला.

त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तीन गडी बाद केले. अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत दुसऱ्या डावात 231 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी मुरलीधरनने दुसऱ्या डावात 228 विकेट घेतल्या आहेत. मात्र, पहिल्या आणि तिसऱ्या डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अजूनही मुरलीधरनच्या नावावर आहे.

मुरलीधरनने पहिल्या डावात 230 आणि तिसऱ्या डावात 236 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 138 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. विशेष म्हणजे मुरलीधरनने (800) कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

त्याच्या खालोखाल वॉर्न (708) तर अँडरसन (685) तिसऱ्या स्थानावर आहे. वेलिंग्टन कसोटीबद्दल बोलायचे तर, शनिवारी इंग्लंडने पहिला डाव 435/8 धावांवर घोषित केला. जो रूटने नाबाद 153 आणि हॅरी ब्रूकने 186 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने चार विकेट घेतल्या.

न्यूझीलंडचा संघ मोठ्या धावसंख्येसमोर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याची सुरुवात चांगली झाली नाही. अँडरसनने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.त्याने केन विल्यमसन (4) आणि विल यंग (2) यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्याच्याशिवाय जॅक लीचने तीन आणि स्टुअर्ट ब्रॉडने एक बळी घेतला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला. तोपर्यंत 42 षटकांत न्यूझीलंडची धावसंख्या 138/7 अशी होती.