महाराष्ट्र

कोपर खाडीत बेकायदेशीर रेती उपसा : तहसीलदारांची धाड !

रेती माफिया पसार : १५ लाखाचा मुद्देमाल नष्ट

डोंबिवली , दि ५ : डोंबिवली पूर्वेकडील कोपर खाडीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उपसा स्थानिक ग्रामस्थांनी उघकिस आणलाय . रेती उपसा करणारे बाज ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडली मात्र रात्रीच्या अंधारात बाज सोबत असलेली बोट व रेतीमाफीयानी पळ काढला.याबाबत तहसील प्रशासनाला माहिती मिळताच नायब तहसीलदारांचे पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसील प्रशासनाकडून सदर रेतीची बाज ,सेक्शन पंप कापून पेटवून दिला व रेतीचा साठा जप्त करत तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.दरम्यान या घटनेच्या निमित्ताने कोपर खाडी परिसरात बेकायदेशीरपणे होणाऱ्या रेती उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील कोपर खाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरी छुपे बेकायदेशीरपणे रात्रीच्या अंधारात रेती उपसा सुरू होता . त्यामुळे खाडीलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनत चालल्या होत्या.याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र हे रेती माफीया रात्रीच्या अंधारातच रेती उपसा करत पळून जात होते.काल देखील रात्रीच्या अंधारात रेती माफिया कोपर खाडी किनारी रेती उपसा करत होते .याच दरम्यान ग्रामस्थांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत या रेतीमाफियाना अटकाव करण्याचा प्रयत्न केला ..याच दरम्यान मध्यरात्रीनंतर ओहोटी लागल्याने रेती माफियांचा बाज व बोट खाडीकिनारीच अडकली तर बाज सोबत असलेल्या बोटीमधील रेतीमाफियानी पळ काढला . आज सकाळी या घटनेबाबत तहसीलदारांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.रेती उपसा करणारा सेक्शन पंप ,बाज कापत पेटवून दिला तर रेतीचा साठा नष्ट केला .तसेच संबधित रेतीमाफीयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तहसील प्रशासनाने सांगितले .या कारवाई बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी ग्रामस्थ व माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी केली आहे .