देश

निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही

नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आचरसंहित भंग केल्याच्या एका प्रकरणात मोठा दिलासा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने कसे काम करायचे हे आम्ही सांगू शकत नाही असे उच्च न्यायालायने याचिका फेटाळताना म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी देवी देवतांच्या नावांवर मत मागितल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.

याचिकाकर्त्याने उत्तर प्रदेशात निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. वकील आनंद एस जोंधळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत पंतप्रधानांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आधीच ठरवून टाकले आहे.सर्वोच्च न्यायालयही निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष मत घेण्याचे निर्देश देऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्त्याने आधीच निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला असून आयोग त्याच्या तक्रारीचा स्वतंत्रपणे विचार करू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अपीलवर निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाचीही दखल घेतली. निवडणूक आयोगाकडे दररोज असे अर्ज येत आहेत. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे अधिवक्ता सिद्धांत कुमार म्हणाले.

तप्रधान मोदींनी ६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलभीत येथे निवडणूक सभेमध्ये हिंदू देवता आणि शीख गुरूंचा उल्लेख केला होता. पिलभीतमधील भाजप उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारून त्यांनी राम लल्लांचा अपमान केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या त्यांच्या पक्षातील लोकांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले.