महाराष्ट्र

सुमारे सात लाख भाविकांनी मुख आणि पदस्पर्श दर्शन घेतल्याची नोंद

सोलापूर – आषाढी यात्रेच्या निमित्ताने गेल्या 12 दिवसांमध्ये तब्बल 9 लाख 62 हजार भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. तशी नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. आज पर्यंतच्या इतिहासात फक्त 12 दिवसांमध्ये दर्शनाची विक्रमी नोंद झाली आहे‌.यंदा आषाढी यात्रेसाठी विक्रमी गर्दी झाली होती.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या पूर्वी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 7 जुलै पासून विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन‌ सुरू करण्यात आले आहे. 14 जुलैपर्यंत सुमारे सात लाख भाविकांनी मुख आणि पदस्पर्श दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.तर, द्वादशी म्हणजे 18 जुलैपर्यंत तब्बल 9 लाख 62 हजार भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक दर्शनाची नोंद आषाढी एकादशीच्या दिवशी झाली आहे. या दिवशी सुमारे 50 हजार भाविकांनी पदस्पर्श, तर 30 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले.