अमरावती – राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला असून पिकांचे अतोनात नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची बाजारात आवक कमी झाली आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकगृहातून टोमॅटो हद्दपार व्हायला सुरुवात झाली आहे.
जेवणात महत्त्वाचं स्थान असलेल्या टोमॅटोच्या चवीपासून अनेकांना वंचित राहावं लागतंय, गेल्या आठवड्यात ४० ते ६० किलोवर असलेले टोमॅटो सध्या शहरात ७० ते ८० रुपयांना विकले जात आहेत. परिणामी टोमॅटोची जेवणातील चव – राखण्यासाठी टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचअपची मागणी वाढतअसल्याचे दिसत आहे. टोमॅटोचे वधारलेले दर बघता गृहिणींनीही आता टोमॅटोची गरज नसलेल्या भाज्या म्हणजे भेंडी, भोपळा, पालेभाज्या करण्यावर भर दिला आहे.
मागील आठवड्यापर्यंत राज्यात कित्येक भागांत पाऊस बरसला नसल्याची ओरड होती. आता मात्र विदर्भासह अवघ्या राज्यालाच पावसाने पार धुवून काढले आहे. कित्येक भागात पूर परिस्थिती असून शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. अशात पिकांचे नुकसान होत असतानाच भाजीपालाही त्यापासून सुटलेला नाही. परिणामी आवक कमी असून टोमॅटोही यामुळेच भाव खात आहे.