मुंबई

टेंडर प्रक्रियेत गडबड करून नियमबाह्य पद्धतीने कोट्यावधीची औषधे मागवण्याचा घाट

निवडणुकीच्या तोंडावर नियमबाह्य खरेदीसाठी मंत्र्यांचा दबाव

मुंबई – टेंडर प्रक्रियेत गडबड करून नियमबाह्य कोट्यावधीची औषधे मागवण्याचा घाट कामगार विमा रुग्णालयांमध्ये घातला जात आहे. आपल्या मर्जीतील ठराविक ठेकेदारांकडून ठराविक औषधांची यादी दस्तुरखुद्द आरोग्य मंत्र्यांनीच रुग्णालयांना दिली असून त्यानुसार मागणी नोदवण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी चक्रावले आहेत. निवडणूक निधी वसुलीची प्रक्रिया तर सुरू नाही ना, अशी चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे. राज्यात २० राज्य विमा कामगार रुग्णालये आहेत. त्याचे मुख्यालय लोअर परळ येथे आहे. या रुग्णालयात औषधे आणि इतर वैद्यकीय सामग्रीचा साठा दर तीन महिन्याला तपासून आवश्यकतेनुसार मागणी नोंदवली जाते. अपवादात्मक परिस्थितीत दोन तीन महिन्याचा अधिकचा साठा मागवला जातो. त्यामध्ये ३०० प्रकारची औषधे व सामग्रीचा समावेश त्यामध्ये आहे. दर तीन महिन्याला सुमारे १८ ते २० कोटींची औषधे व सामग्री लागते. नियमित प्रक्रिया डावलण्यास एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. तेव्हा विरोध करणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्याची त्याच रात्री परस्पर उचल बांगडी केली. बदलीचा सरकारी आदेश देता नियमबाह्य बदली करून त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत हा साठा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आरोग्य संचालनालयात मोठी धांदल उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी प्रचंड दबावत असल्याचे बोलले जात आहे.