देश

निवडणूक आयोगाचे पथक करणार जम्मू-काश्मीरचा दौरा

राज्यात निवडणुकीची शक्यता पडताळून पाहणार

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे एक पथक 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करेल आणि येथे निवडणुका घेण्याच्या शक्यता पडताळून पाहतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार स्वतः आयोगाच्या टीमचे नेतृत्व करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर 2 निवडणूक आयुक्त – ज्ञानेश कुमार आणि एसएस संधू देखील उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाची टीम प्रथम श्रीनगरमध्ये राजकीय पक्षांची भेट घेणार आहे. याशिवाय ही टीम केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाची टीम मुख्य सचिव, डीजीपी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे. यानंतर 10 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाची टीम जम्मूला भेट देईल आणि विविध सुरक्षा यंत्रणांना भेटेल. यानंतर निवडणूक आयुक्त जम्मूमध्येच पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि निवडणुकीच्या तयारीबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देतील.