राजकीय

राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था अखेर केंद्र सरकारच्या ताब्यात

मुंबई : राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था महानंदा डेअरी अखेर केंद्र सरकार संचालित राष्ट्रीय दुग्धविकास संस्थेच्या ताब्यात गेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय गुजरात राज्यातील आणंद गावी आहे. याच आणंद गावात अमूलचे मुख्यालय आहे. महानंदा डेअरी हळूहळू पूर्ण बंद करून डेअरीची गोरेगाव येथील 50 कोटी रुपयांची 27 एकरची प्रचंड जमीन अदानी उद्योगाकडे देण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप उबाठा गटाचे संजय राऊत यांनी केला. महानंदा डेअरीच्या संचालक पदावर असलेले राजेश पराजणे आणि सर्व संचालक सदस्यांनी राजीनामा दिला आहे. चेअरमन राजेश पराजणे हे दुग्धविकास मंत्री भाजपाचे राधाकृष्ण विखे- पाटील यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात पराजणे यांनी राजीनामा दिल्यावर गदारोळ माजला. तेव्हा त्यांनी राजीनामा परत घेतला. मात्र आता डेअरी ही केंद्रीय बोर्डाच्या हवाली करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री महानंदा डेअरीच्या नव्या घडामोडींची माहिती देत ट्वीट करून ‘महानंद गुजरातला विकलेय’, अशी टिप्पणी केली.
राज्यात सर्व खाजगी दूध संस्था व्यवस्थित सुरू असताना नियोजनपूर्ण रितीनेी आरे दूध बंद करण्यात आले आणि आता महानंदा दूध केंद्रिय संस्थेकडे सुपूर्द केले आहे. महानंदाला पुरेसे दूध पुरवठा होत नाही, अशी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महानंदा तोट्यात अशी ओरड सुरू झाली आहे. पुढे 1200 कामगारांपैकी 530 कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देऊन कमी केली. उर्वरित कामगारांचे पगार गेल्या वर्षापासून अडविण्यास सुरुवात केली. 2023 च्या डिसेंबर महिन्यात महानंदाचे कामगार आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. आम्हाला गेले 6 महिने पगार दिला नाही, आम्हाला पगार द्या ही त्यांची मागणी होती. कामगारांचे हळूहळू 130 कोटी रुपये थकवण्यात आले आणि मग ही सर्व कारणे एकत्रित करून महानंदा ही दूध उत्पादक शिखर संस्था ही केंद्राच्या हवाली केली.