मुंबई

ठाण्यात कमळ नको पण धनुष्यबाण हवा

ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविल्याने येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आले आहे. आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

सरनाईक यांनी पाठविलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचे असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढविल्याची चर्चा होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही उमेदवारी देऊ नका, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे.

महायुतीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम असल्याच्या चर्चेमुळे शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला असून मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातील जागेसाठी झुंजावे लागत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. विशेष म्हणजे, ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर हि निवडणूक लढवावी असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

आतापर्यत सात खासदारांना उमेदवारी मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. जागा वाटपाच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारल्याचे चित्र यामुळे पुढे येत असले ठाणे, कल्याण, पालघर या मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा राहीलेल्या भागातील मतदारसंघाचे चित्र अजूनही स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता शिगेला पोहचली आहे.