देश

यूपीएससीकडून पूजा खेडकरांविरोधात कडक कारवाई

नवी दिल्ली – महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची चर्चा आहे. यासोबत पूजा यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतक-याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. दुसरीकडे आता पूजा खेडकरांवर देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई करीत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच यूपीएससीने खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील यूपीएससीने खेडकरांकडे केली आहे. पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी कोट्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय सेवेत रुजू झाल्यानंतर त्या चुकीच्या मागण्या करू लागल्या होत्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांची फाईल उघडली असता एकामागून एक त्रुटी आढळून आल्या.

यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. यासोबत पूजा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.