पुणे

पक्ष संघटना मजबूत करा ! – अजित पवार

पुणे : युवा पदाधिकारी असताना 1999 ते 2004 या कालखंडात राज्य पिंजून काढले. त्याचा परिणाम 2004 च्या निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. मुख्यमंत्रीपद का मिळाले नाही, याच्या जास्त खोलात मी आता जाणार नाही. मात्र आताही जरा दमाने घ्या. सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, प्रथम पक्ष संघटना मजबूत करा मग मुख्यमंत्रीपदाचे पाहू, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना रविवारी दिला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मिशन या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार पुढे म्हणाले की, भाजपबरोबर सत्तेत असलो तरी विचारधारा कायम आहे.राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांची बरोबर जाण्याची भूमिका होती. मात्र वरिष्ठांनी ही भावना समजून घेतली नाही, पण ती समजून घेतल्याचे भासविले. पक्षाची फरफट होऊ नये म्हणूनच ठोस भूमिका स्वीकारावी लागली. गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडून दूरध्वनी केले जात नव्हते. चौकशी केली जात नव्हती. आता मात्र चौकशी सुरू आहे. त्यामुळे दूरध्वनी आले तरी हळवे होऊ नका, मनाची चलबिचल होऊ देऊ नका. महायुती देईल त्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा.