मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम सरकार देईल असे न्यायालयात सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर परिपत्रक काढताना एक वर्षच निधी देण्याचे परिपत्रक शासनाने प्रसारित केले, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला. सरकारच्या या चुकीच्या भूमिकेमुळे एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. जून २०२४ या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. पण ती सरकारने फेटाळली असा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस इंटक युनियनचे राज्य सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. त्यामुळे जून महिन्याचे वेतन आता मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे असे त्यांनी सांगितले. या विरोधात एसटी कर्मचारी एकवटणार आहेत असेही ते म्हणाले.