सोलापूर – शहरातून बेपत्ता झालेल्या लोकांना शोधन्यासाठी सोलापूर पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. या मोहीमेत शहरातील 144 बेपत्ता नागरिकांना शोधून सुरक्षित घरात आणण्यासाठी सोलापूर पोलिसांनी जीवाचे रान केले.पोलिसांनी ही कारवाई 7 दिवसांमध्ये करण्यात आली. यामध्ये सोलापूर पोलिस आयुक्तालय हद्दीतील सात पोलिस ठाण्यांमधील सात पथक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील एक असे एकूण आठ पथके तयार करून 144 बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबियाकडे सोपविण्यात आले.
दरम्यान, सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस तपासात हरवलेल्या पुरुष, महिला, मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सातही पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने विशेष शोध मोहीम राबवून शहरातून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला. यामध्ये 76 महिला, 62 पुरुष, सहा बालकांचा समावेश आहे. ही शोध मोहीम 25 ते 31 जुलै दरम्यान राबविली. यापूर्वी माहे डिसेंबर 2023 ते अद्यापपर्यंत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवून एकूण 663 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे. विशेष शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी अभिनंदन केले.