महाराष्ट्र मुंबई

सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांची रिपाइं ठाणे प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई – रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे प्रदेश उपाध्यक्ष पदी उल्हासनगरमधील सिंधी समाजाचे समाजसेवक व्यापारी आणि ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत बांद्रा येथे केली.

रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना सन्मानाचे स्थान आहे.रिपब्लिकन पक्ष केवळ दलितांचा पक्ष नसून सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आम्ही साकार करीत असताना आम्हाला सर्व जाती धर्मियांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .सिंधी समाजातून येणारे समाजसेवक व्यापारी ज्येष्ठ कार्यकर्ते नंदलाल वाधवा यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी अधिकृत नियुक्ती केल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली.

रिपब्लिकन पक्षात मुंबई प्रदेशप्रमाणे ठाणे प्रदेश कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्हा मिळून ठाणे प्रदेशची रिपब्लिकन पक्षात नव्याने कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. ठाणे प्रदेशचे अध्यक्ष बाळाराम गायकवाड असून उपाध्यक्ष पदी नव्यानेच नंदलाल वाधवा यांची नियुक्ती केल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांची रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण आदी भागातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे; ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.