देश

शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार – अमित शाह

पुणे – विरोधक भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. मात्र देशाच्या राजकारणात शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सूत्रधार आहेत. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचे काम कुणी केलंय तर ते शरद पवारांनीच केलंय, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांवर जोरदार टीका केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. शाह पुढे म्हणाले, भारताच्या राजकारणात सर्वांत जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात पवारांनीच भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही २०१४ ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं.

पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार : जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलंय? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या २४० जागा आल्यात, यांच्या सर्वांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय. आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो. २०२४ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

आम्ही आरक्षणाला बळच दिलं : विरोधकांनी म्हटलं, भाजप आरक्षण संपवत आहे. आम्ही उत्तर देताना काही ठिकाणी संकोच करत होतो. लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. मी आज सांगायला आलो आहे की, १० वर्षांचा एक्स्टेन्शन नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मिळालं आणि पूर्ण बहुमत असतानाही आरक्षणाला बळ देण्याचं काम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विरोधकांनी संविधानाचा विषय काढला. आम्ही उत्तर दिलं. आता निवडणूक महाराष्ट्रात आली आहे. आता नव्यानव्या प्रकारचे गैरसमज शरद पवार उभे करत आहेत, असा आरोपही शाह यांनी केला.