मुंबई

कोस्टल रोडची सी लिंकला जोडणारी मार्गिका खुली

मुंबई- कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनीचा आणखी एक भाग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे वरळी-वांद्रे सी- लिंकपर्यंतचा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ही वाहिनी वाहनांसाठी खुली झाली. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करता येणार असून शनिवार व रविवार हा मार्ग बंद असणार आहे. या मार्गिकामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास करता येईल.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यात ‘मुंबई किनारी रस्ता’ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या मार्गिकेची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. सध्या ९१ टक्के काम झाले आहे. १०.५८ किमीचा कोस्टल रोड आणि ४.५ लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक यांना जोडणाऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाल्यामुळे हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. वरळी सी लिंकचा मार्गदेखील १५ ऑगस्ट पर्यंत खुला होणार आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.