महाराष्ट्र

रुक्मिणी मातेची पालखी पहिल्यांदाच पंढरपुरात

अमरावती – येत्या बुधवारी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून निघालेल्या शेकडो पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरामध्ये दाखल झाली आहे. मानाची रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल झाली असून अमरावतीच्या कोंडीन्यपूर येथून पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. ७०० किमीचा प्रवास करून विठुरायाच्या सासुरवाडीची पालखी आल्याने पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण होते. आषाढी यात्रेसाठी आता मानाच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्या सासरची अर्थात रुक्मिणी मातेच्या माहेरची कौंडण्यपूर येथील मानाची पालखी रविवारी पंढरपुरात दाखल झाली.

७०० किलोमीटरचा प्रवास करत रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा पंढरपूरला आला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा गजर करत पालख्या दाखल झाल्या आहेत. मानाच्या संताच्या पालख्यामध्ये असणारी संत मुक्ताई यांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मुक्ताईनगर जळगाव येथून ३५ दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूर येथे दाखल झाली आहे. आता आषाढीच्या वेध लागले असताना पहिल्यांदाच प्रमुख संतापैकी संत मुक्ताई पंढरपूर नगरीत दाखल झाल्या आहेत. ही पालखी आता पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात वास्तव्यास असेल तर बंधू भेटीसाठी ही पालखी १६ जुलै रोजी वाखरी येथे जाईल.