सर्व जाती धर्मियांना एकत्र आणणे हेच आंबेडकरांचे मिशन
लखनौ : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा खरा पक्ष हा रिपब्लिकन पक्षच आहे. सर्व जाती धर्मीयांना एकत्र आणणे हेच डॉ बाबसाहेब आंबेडकरांचे मिशन आहे. त्यानुसार आम्ही काम करीत असून आगामी काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल, त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असून सर्व जाती धर्मियांपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहचावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लखनौ येथील रविंद्रालयमध्ये रिपाइं कार्यकर्ता संमेलनात आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात विधानसभेचे 403 मतदारसंघ आहेत. 75 जिल्हे आहेत. 25 करोड लोकसंख्या आहेत. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात आगामी काळात रिपब्लिकन पक्षाचे 1 करोड सदस्य बनवावे, असे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.
उत्तर प्रदेशात पूर्वी फक्त रिपब्लिकन पक्ष होता. हत्ती हे निवडणूक चिन्ह मूळ रिपब्लिकन पक्षाचेच होते. नंतर च्या काळात उत्तर प्रदेशात बसपाने रिपाइंची जागा घेतली रिपाइंचे हत्ती हे निवडणूक चिन्ह ही मिळवले. आता मात्र आमचा निर्धार आहे की बसपने रिपब्लिकन पक्षाची घेतलेली जागा आणि हत्ती हे निवडणूक चिन्ह पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडे आम्ही खेचून आणू. उत्तर प्रदेशात पुन्हा रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आठवले यांनी केले.
यावेळी बहुजन समाज पक्ष; समाजवादी पक्ष आणि सोहेलदेव भारतीय पक्ष या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाचे स्थान देणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले.