नागपूर : अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्य सरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याची पाहायला मिळाले. अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. याचसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष १८ हजार रुपये मिळणार आहेत.