महाराष्ट्र

गुजरातच्या जीएसटी अधिका-याची ६४० एकर जमीन खरेदी; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा कांदाडी खो-यातील झाडाणी या गावात गुजरातच्या एका जीएसटी अधिका-याने मोठ्याप्रमाणावर जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी मंगळवारी हा मुद्दा विधानसभेत मांडला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वनखाते आणि महसूल खात्याच्या अधिका-यांवर गंभीर आरोप केले.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाडाणी गाव आहे. हे गाव आणि त्याच्या परिसरातील ६४० एकर जमीन गुजरातमधील एका अधिका-याकडून अत्यंत माफक दरात खरेदी केली आहे. हा अधिकारी कोण आहे? संबंधित अधिकारी हा गुजरातच्या जीएसटी विभागाचा प्रमुख आहे. त्याने कांदाडी खो-यातील ही जमीन खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. जमीन खरेदीची कमाल मर्यादा पायदळी तुडवण्यात आली. तसेच या जमिनीसाठी रस्ते काढताना ते वनजमिनींमधून खोदून काढण्यात आले. वनखात्याच्या अधिका-यांशी संगनमताने हे सर्व करण्यात आले. भागात रस्ते खोदताना महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. महसूल खात्याच्या मालकीच्या जमिनीतून हे रस्ते काढण्यात आले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत मंगळवारी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सत्ताधा-यांवर चांगलेच संतापताना दिसले. त्यांना सभागृहात महसूल विभागासंबंधी प्रश्न विचारायचा होता. मात्र, तेव्हा विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला.