देश

पुनिया आणि फोगाट काँग्रेस सत्ता खेचून आणण्यासाठी लढणार?

नवी दिल्ली –  पॅरिस ऑलिंपिकमधून परतल्यानंतर विनेश फोगाटने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोघांनीही आज नवी दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज, बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. हरियाणात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यात दोन्ही कुस्तीपटू काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बजरंग आणि विनेश दोघेही आपल्या वर्तमान पदाचा राजीनामा देणार असल्याचा काँग्रेसमधील सूत्रांचा दावा आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर, काँग्रेस सत्ता खेचून आणण्यासाठी लढणार आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीची बोलणीही त्यांनी सुरू केली आहेत. तसेच, उमेदवारांची यादीही जवळपास निश्चित केली आहे.

विनेश फोगाट नुकतीच शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. त्यावेळी विनेशला निवडणूक लढवण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिनं थेट उत्तर देणे टाळले होते. ‘मला याबद्दल बोलायचे नाही. मी माझ्या कुटुंबियांना (शेतकऱ्यांना) भेटायला आलो आहे. त्यामुळे माझ्या ऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे अन्यथा त्यांचा संघर्ष वाया जाईल. मी एक खेळाडू आणि भारताची नागरिक आहे. माझ्यासाठी निवडणुका हा प्राधान्याचा विषय नाही. माझे लक्ष फक्त शेतकऱ्यांच्या कल्याणावर असल्याचे ती म्हणाली होती.

विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन देशभरात गाजले होते. त्यानंतर विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकापर्यंत माजल मारली होती. मात्र, वजनातील फरकामुळे तिला पदकाला मुकावे लागले. त्यानंतर तिने कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्ती घोषणा केली होती.