देश महाराष्ट्र

चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी, माहिती देणाऱ्याला २० लाखाचे बक्षीस

जम्मू – जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज, शनिवारी कठुआ जिल्ह्यातील उंच भागात ‘ढोक’ (मातीच्या घरांमध्ये) दिसलेल्या 4 दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. तसेच यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास पोलिसांनी 20 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. कठुआ जिल्ह्यातील माचेडी या दुर्गम जंगल परिसरात 8 जुलै रोजी लष्कराच्या गस्ती पथकावर या जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) 5 जवान शहीद झाले होते. व्यापक शोधमोहीम राबवूनही पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित काश्मीर टायगर्सचे दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत. त्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केली होती.

पोलिसांनी ट्विटरवर (एक्स) एका पोस्टमध्ये 4 दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. हे दहशतवादी शेवटचे कठुआ जिल्ह्याच्या मल्हार, बानी आणि सोजधरच्या जंगलातील ‘ढोक’मध्ये दिसले होते. यासंदर्भात माहिती देताना कठुआचे पोलिस अधीक्षक अनयत अली म्हणाले की, पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत, ज्यांना मल्हार, बानी आणि सेओजधर येथे शेवटचे पाहिले गेले होते. कठुआ पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “…कारवाई करण्यायोग्य माहितीसाठी प्रत्येक दहशतवाद्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस आहे. दहशतवाद्यांबद्दल विश्वासार्ह माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील दिले जाईल.