अर्थ

पेटीएम करणार कर्मचारी कपात

नवी दिल्ली : पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीत कर्मचारी कपात करणार आहे. कंपीनीने त्यांच्या काही विभागातील व्यवस्थापकांना येत्या दोन आठवड्यात त्यांच्या विभागातील २० टक्के कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकांवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता कंपनीत नोकरकपात केली जाणार आहे.

किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे, याचा आकडा अद्याप प्रसिध्द करण्यात आलेला नाही. यामध्ये १००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनातील प्रत्येक विभागाची पुनर्रचना करण्याचे व्यवस्थापनाचे आदेश आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. विभागातील व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना कपातीची माहिती दिली जात आहे. दरम्यान, यापूर्वी २०२३ मध्ये पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सने कर्मचारी खर्च १५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. यावेळी पेटीएमच्या विविध विभागांमधून १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दहा टक्के कामगारांना कपातीचा फटका बसला होता.