देश

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग – अमित शाह

चंदीगड – सैन्यातील अग्निवीर योजनेवरून विरोधकांची सरकारवर सातत्याने टीका सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केलीय. सैन्यातला कार्यकाळ पूर्ण करून परतणाऱ्या अग्निवीरांना आम्ही नोकऱ्या देऊ अशी गॅरंटी शाह यांनी दिली. हरियाणा येथे आज, मंगळवारी आयोजित प्रचारसभेत गृहमंत्री बोलत होते. यासंदर्भात शाह म्हणाले की, राहुल गांधी आणि हुड्डा कुटुंब अग्निवीर योजनेसंदर्भात देशातील जवानांना संभ्रमित करत आहे. हरियाणातील सर्व अग्निवीरांना गॅरंटी देतो की, ते जेव्हा सैन्यातून परततील, तेव्हा आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली. यावेळी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे, पाकिस्तान सोबत चर्चा करणे आणि दहशतवाद्यांना सोडून देणे. पुन्हा एकदा 370 परत आणण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र ते असे कधीही करू शकणार नाहीत. यावेळी, शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातही मोठे भाष्य केले. पाकव्याप्त काश्मीर आपला आहे आणि भारताचा अविभाज्य भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणाची भूमी ही वीरांची भूमी आहे, हरियाणाचे जवान आज देशात सैन्याचा सन्मान वाढवत असल्याचे शाह यांनी सांगितले.