महाराष्ट्र

बोगस नोंदीमधून वयोवृद्धांची फसवणूक होत असल्यास लक्षात आणून द्या – हसन मुश्रीफ

कोल्हापूर-आजच्या काळात अशिक्षित, वयोवृद्ध लोकांना वेगवेगळ्या प्रकारे खरेदी विक्रीमध्ये फसवले जाते. हा सर्व प्रकार नोंदणी कार्यालयात होतो. अशा फसवणूकीचे प्रकार लक्षात येताच अधिकारी कर्मचाऱ्यांनी लगेच संबंधितास व वरिष्ठ कार्यालयास लक्षात आणून देणे गरजेचे आहे. यातून गोरगरीबांची फसवणूक होणार नाही, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्यांच्याहस्ते नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक श्रेणी १, गडहिंग्लज कार्यालयाचे लोकार्पण संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीत जीएसटी, मुद्रांक व उत्पादन शुल्क हे तीनच विभाग मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करून देत असतात. यामधील मुद्रांक विभागाला चांगल्या इमारतींची व पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. आता यात बदल होवून चांगल्या इमारती व जागा मिळत आहे. यातून चांगल्या सुविधा निर्माण झाल्या तर मुद्रांकही वाढेल. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे त्यांनी कार्यालयांना जागा मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद मानले. जिल्हयातील जागा मिळालेल्या १० दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतींसाठी लवकरच निवडणूकांपूर्वी निधी आणू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जुन माने, तहसिलदार ऋषीकेश शेळके, गट विकास अधिकारी शरद मगर, मुद्रांक विभागाचे धनंजय जोशी, कौसर मुलाणी, भिकाजी पाटील उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक संजय शिंदे यांनी आत्तापर्यंत १० कार्यालयांना जागा दिली, एकाचे नूतणीकरण व एका कार्यालय इमारतीचे लोकार्पण होत असल्याचे सांगून हे काम कोणा एकाचे नसून टीम वर्क असल्याचे सांगितले. त्यामूळे आता कोणतेही काम अशाच पध्दतीने झाल्यास वेळेत पूर्ण होईल. आता जागा मिळालेल्या १० दुय्यम कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रक तयार केले जाईल. त्यानंतर आवश्यक निधी पालकमंत्री व शासनाच्या मदतीने उपलब्ध करून तातडीने तीही कामे वेळेत पूर्ण करू असे सांगितले. जर ही कार्यालये सुसज्ज झाली तर राज्यात कोल्हापूर जिल्हा असा जिल्हा असेल की स्वतंत्र व स्व:ताच्या मालकीची कार्यालये असणारा एकमेव असेल. यातून निश्चितच चांगली सेवा लोकांना दिली जाईल असे पुढे म्हणाले. आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मध्येही अशा प्रकारच्या कार्यालयाची गरज असल्याचे नमूद केले. ते म्हणाले निधीची गरज तत्काळ दूर करण्यासाठी पालकमंत्री सहकार्य करतील. जागा मिळाली आहे आता इमारत लवकरात लवकर उभी करावी जेणेकरून नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होईल. जुने दस्त, जुन्या कागपत्रांच्या नोंदी या विभागाने चांगल्या प्रकारे ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपजिल्हाधिकारी मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे यांनी कोल्हापूर जिल्हयात १८ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यापैकी स्वत:ची जागा असणारे व स्वमालकीची नवीन इमारत असणारे गडहिंग्लज हे पहिले कार्यालय असल्याचे आपल्या मनोगत प्रास्ताविकात सांगितले. ते म्हणाले, नोंदणी व मुद्रांक विभाग हा सर्वात जास्त महसूल जमा करून देणारा विभाग आहे. जिल्हा निबंधक तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी १८ पैकी आवश्यक १० ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयांना जागा उपलब्ध करून दिली. आता जिल्ह्यातील सर्वच कार्यालये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च दर्जाची करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नव्याने मुरगूड व शाहूवाडीलाही दुय्यम निबंधक कार्यालये मंजूर झाली आहेत. आता ज्याठिकाणी इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आहे त्या सर्व कार्यालयांसाठी इमारत बांधकाम निधी मंजूर झाल्यास तातडीने तीही कामे वेळेत पुर्ण करू. यानंतर निश्चितच जिल्ह्यातील सर्व दस्त नोंदणी अधिक गतीमान होईल. दररोज या विभागातू पावणे दोन कोटी महसूल शासनाकडे जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जुन माने यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा निबंधक शिंदे यांचे जिल्हा मुद्रांक भवनसाठी १५ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. जीएसटी नंतर शासनाकडे सर्वांत जास्त महसूल जमा करणार हा विभाग असून आता नवे तंत्रज्ञान व कार्पोरेट लूक देण्याची गरज या कार्यालयांना आहे. यातून येथील सेवा अधिक गतीमान होईल असे त्यांनी प्रतिपादन केले.