मुंबई – महाराष्ट्राच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणुकीत उतरून मतदारांना प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाने अधिकृत मान्यता देत ‘एबी फॉर्म’ दिला असल्याने, मलिक यांनी आपला पक्ष आपल्यासोबत ठाम असल्याचे सांगितले आहे.
मलिक यांनी निवडणुकीच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना मतदारसंघातील नशामुक्तीचे आव्हान पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केलं की, समाजवादी पक्षापासून लांब राहा, कारण त्यांचं कार्यालय नशेमुळे ग्रस्त असल्याचे त्यांना जाणवले.
राज्यातील राजकीय संदर्भात अजित पवार हे ‘महाराष्ट्राचे चंद्राबाबू नायडू’ असल्याचे मलिक म्हणाले. अल्पसंख्याक समाजासाठी पवारांनी केलेल्या योगदानाची प्रशंसा करताना, मलिक म्हणाले, अजित पवार नेहमी अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. माझ्या कार्यकाळात मौलाना आझाद महामंडळाच्या बाबतीत घेतलेला निर्णय असो किंवा शाळेतील शिक्षकांचे पगारवाढीचे मुद्दे असोत, पवार साहेबांनी प्रत्येक वेळी सहकार्य केले आहे. तसेच विशाळगड, सातारा आणि मीरा रोड येथील घटनांवर अजित पवारांनी स्वतः लक्ष घातल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे भविष्यातील सरकार अजित पवारांशिवाय स्थिर राहू शकणार नाही, असे मलिक म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदरशांमधील शिक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, मलिक यांनी हे आरोप चुकीचे असल्याचं स्पष्ट केले. त्यांनी सांगितलं, मदरसे म्हणजे शाळा आहेत आणि अशा ठिकाणी धार्मिक द्वेषभावना पसरवणं अशक्य आहे.
मलिक यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनाही सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, दाऊदसोबत कोणताही संबंध नाही, आणि जे या प्रकारचे आरोप करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. काही प्रसारमाध्यमांवर चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल त्यांनी आधीच नोटीस पाठवली असून, आता त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे सांगितले.