देश

अवयव दान करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज – अनुप्रिया पटेल

नवी दिल्ली  – “देशात अवयवदानाची प्रचंड आवश्यकता विचारात घेता मृत व्यक्ती आणि ‘ब्रेन स्टेम डेड’ अवस्थेतील लोकांचे अवयव दान करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे आणि एक अवयवदाता 8 लोकांना नवे जीवन देऊ शकतो यावर विशेष भर दिला आहे”, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. त्या आज नवी दिल्लीत 14व्या भारतीय अवयवदान दिवस समारंभामध्ये बोलत होत्या. राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटेल यांनी मृत्यूनंतर अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबियांची प्रशंसा केली. अनेक लोकांचे जीव वाचवून त्यांनी महान मानवसेवा केली आहे, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण देशासाठी असे लोक प्रेरणास्रोत आहेत असे सांगत त्यांनी सर्व देशवासियांना मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्ती आणि संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच भारत अवयवदान आणि प्रत्यारोपणात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना देखील असे आवाहन केले की प्राप्त होणाऱ्या अवयवांपैकी कोणताही अवयव प्रत्यारोपणापूर्वी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी सन्माननीय अतिथी असलेले विनोद कुमार पॉल यांनी अवयवांची मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेली मोठी तफावत देखील अधोरेखित केली. अवयव प्रत्यारोपणाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये संस्थात्मक सुधारणांची गरज त्यांनी व्यक्त केली.