पुणे : कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत विवाहाचा धुमधडाका सुरू होता. ११, १४ व १५ जुलैला शेवटच्या मोठ्या मुहूर्तावर विवाहाचा योग अनेकांनी साधून घेतला. आता आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाहांना ‘ब्रेक’ लागेल. राज्यात आषाढी एकादशीपासून विवाह सोहळे पूर्णपणे बंद होतात. कार्तिकी एकादशी तथा तुलसीविवाहापासून विवाहांचा श्रीगणेशा होईल.
गेल्या कार्तिकी एकादशीपासून आजच्या आषाढी एकादशीपर्यंत ६१ विवाह मुहूर्त होते. मे महिन्यात गुरुचा अस्त होता. त्यामुळे नोकरदार वर्गाचा मोठा हिरमोड झाला. विवाहेच्छूंना ६१ तिथी साधताना मोठी धावपळ करावी लागली. या महिन्यात १६ जुलैपर्यंत प्रत्येक दिवस तिथी समजून विवाहेच्छूंनी मुहूर्त साधून घेतला. खान्देशात आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत विवाहाचे मुहूर्त नसतात. या कालावधीला ‘देव बसणे’ किंवा ‘देव झोपले’ असे म्हटले जाते.
आजपासून विवाहाच्या तिथी संपल्या आहेत. गेल्या वर्षभरात ६१ विवाह मुहूर्त होते. मेमध्ये गुरुचा अस्त होता. त्यामुळे नोकरदार विवाहेच्छूंचा हिरमोड झाला. आता त्यांचे लक्ष कार्तिकी एकादशीकडे राहणार आहे.
आषाढी एकादशीनंतर कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे. १३ नोव्हेंबरला तुलसीविवाह आहे. १३ नोव्हेंबर हा पहिला विवाह मुहूर्त आहे. तोपर्यंत ‘कुर्यात सदा मंगलम’ला ब्रेकच राहील.