ताज्या बातम्या

मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे – मुख्यमंत्री

मुंबई : माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, असे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार तथा सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी भाषा भवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून भवनाचे भूमिपूजन आज सागराच्या साक्षीने होत आहे याचा आपणास आनंद होत आहे. भाषा भवनाचे काम अतिशय दर्जेदार व्हावे असे सांगून या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी माझी माय मराठी भाषा असल्याचे सिद्ध झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले आहे. सर्वांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना जनकल्याणाच्या योजनेतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, वयोश्री अशा योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार मिळत आहे. जनकल्याणाच्या योजना राबवताना राज्याचा विकासही तितक्याच गतीने केला जात आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, समृद्धी महामार्ग असे विकासाचे मोठे प्रकल्प राबवून राज्य विकासात अग्रेसर ठेवले आहे.

मराठी भाषा मंत्री केसरकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल असे भाषा भवन उभारले जाईल, अशी ग्वाही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी व राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण याप्रसंगी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबईच्या ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मराठी साहित्य भवन इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासह बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (2024-25) यातून भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प –

सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन

* जवाहर बालभवन, मुंबई या इमारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृह, संगीत कक्ष, ग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ
* सर ज.जी. कला संस्था वसतिगृह व सर ज.जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन
* शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृह, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
* महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळ, प्रशासकीय इमारत, वांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
* वरळी, मुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
* नायगाव, दादर, भायखळा, शिवडी, शीव (सायन), वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन
* उमरखाडी, डोंगरी, डेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण
* नागरिक, देशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालय, वरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.
* सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/ चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण
* नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण
* मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन
* मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन
* बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ
* कै. श्री. जगन्नाथ शंकरशेट यांचे स्मारक व कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
* जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण
* ए विभाग, मुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ
* ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण
* मुंबई शहरामध्ये 14 ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन
* फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन
* मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ
* ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ
* बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 103 शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण
* मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण
* श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे भूमिपूजन
* दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी
* मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे
* सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्र सामग्री लोकार्पण
* वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण अशा बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.