देश

मणिपूरमधून आसाम रायफल्स हटवण्यास विरोध

कुकी समुदायाच्या आमदारांचे पंतप्रधानांना पत्र

इम्फाल – केंद्र सरकारने मणिपूरमधून आसाम रायफल्सच्या 2 बटालियन हटवून त्याऐवजी सीआरपीएफची तैनाती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील कुकी आमदारांनी विरोध सुरू केलाय. मणिपूरमधील ज्या संवेदनशील भागात जातीय हिंसाचार होत आहे, तेथे फक्त आसाम रायफल्स तैनात करण्यात याव्यात, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

सरकार कांगवाई आणि कांगपोकपी भागातून आसाम रायफल्स हटवून सीआरपीएफ तैनात करण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. कुकी आमदारांनी आसाम रायफल्सचे वर्णन निष्पक्ष दल म्हणून केले आणि केंद्र सरकारचा हा निर्णय एक भयंकर षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. आसाम रायफल्सच्या बटालियन्स मणिपूरमधून हटवून जम्मूमध्ये तैनात केल्या जातील, असा दावा केला जात आहे. अलीकडच्या काळात जम्मूमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळेच सरकार जम्मूमध्ये लष्करी तैनाती वाढविण्याचा विचार करत आहे. कुकी-जो आमदारांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘ज्या वेळी केंद्र सरकार संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे, आसाम रायफल्स काढून टाकत आहे आणि अशा नवीन सुरक्षा दलांना तैनात करत आहे, ज्यांना या क्षेत्राची माहितीही नाही. त्यामुळे हिसाचारात वाढ होण्याची भीती आहे.

आसाम रायफल्सकडे मणिपूरमधील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये सर्वाधिक अनुभव आहे, तसेच स्थानिक लोक, कुकी-जो जमाती आणि मेईतेई समुदायाचे अद्वितीय ज्ञान असल्याचे पत्रात नमूद केले आहे. शांततेच्या वातावरणाला चालना देण्यासाठी या प्रदेशातील संस्कृती आणि भू-राजकीय संवेदनशीलतेची त्यांची समज देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या बटालियन्स हटवल्या जावू नयेत अशी मागणी करण्यात आलीय.