मुंबई

मुंबई-ठाणे, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील बऱ्याच भागात उकाडा वाढला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो आहे. तर, राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे, तर काही भागात पुढील २४ तासासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार बुधवार १७ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आल आहे.

तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी सांताक्रूझ येथे ३९.७, तर कुलाबा येथे ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कर्जत इथे झाली. तर आज तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.