जालना : जालना जिल्ह्यात आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका 32 वर्षीय युवकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. विशेष म्हणजे आपल्या सहकारी फलंजासोबत बोलल्यानंतर काही क्षणांतच हा युवक खाली कोसळला. विजय पटेल असे मृत क्रिकेटपटूचे नाव असून तो मुंबईच्या नालासोपारा परिसरातील रहिवासी होता.
जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सकाळी शहरातील ‘फ्रेजर बॉईज’ या मैदानावर नाताळाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू होते. या सामन्यांदरम्यान बॅटिंग करताना विजय पटेल याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जागेवरच कोसळला. त्यानंतर, मैदानावरील सहकारी मित्रांनी व खेळाडूंनी धावाधाव केली. तर, आयोजकांनी या विजयला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजय याने मैदानावर सिक्सर मारल्यानंतर सहकारी मित्रासोबत चर्चा करत होता. मात्र, चर्चेनंतर तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात विजयच्या सहकारी खेळाडूने सांगितले की, षटकार ठोकल्यानंतर चर्चा करताना विजय अचानक खाली पडल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, पण ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची रुग्णालयात सांगण्यात आले. अचानक झालेल्या या दुर्घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.