देश

हेमंत सोरेन यांच्या जामीनाला विरोध! ईडीची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सोरेन यांची जामिनावर मुक्तता करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या विरोधात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेमंत सोरेन यांनी जामीनावर सुटताच नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विधानसभेत विश्वासदर्शक ठरावही जिंकला. काल त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही केला. मात्र त्याचवेळी सोरेन यांची डोकेदुखी वाढविणारे वृत्त आले आहे. ईडीने सर्वोच्च न्यायालयात सोरेन यांच्या जामिनाला विरोध केला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बेकायदेशीर आहे,असा दावा ईडीने केला आहे.

२८ जून रोजी कथित भूखंड घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे पाच महिने ईडीच्या कोठडीत राहिलेले हेमंत सोरेन कारागृहाबाहेर आले.त्यानंतर झारखंडमधील राजकीय घडामोडींना वेग आला. ३ जुलै रोजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी पदाचा राजिनामा दिला. दुसऱ्याच दिवशी ४ जुलै रोजी हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता मात्र ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.