मुंबई

मुंबई, ठाणे नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस

मुंबई – शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले. मुंबईत सूर्य दर्शन कमी झालं असून ढगाळ वातावरण जास्त असतं. रात्रीच्यावेळी सुरु होणाऱ्या पावसाचा जोर सकाळच्यावेळी वाढतो. त्यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. आजही मुंबईकरांची पहाट तशीच झाली. सकाळच्यावेळी पावसाचा जोर जास्त होता. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच हार्बर लाईनवरील लोकलही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. “आजचे जे सॅटलाइट फोटो आहेत, त्यानुसार पुढच्या 3-4 तासात मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलय. पण त्यामुळे वाहतूक कोलमडलेली नाही. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईच एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.

अमरावती, नागपूरसह पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणि नागपुरात आज, शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक शाळांना सुटी देण्यात आलीय. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठे जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी – नाले ओसंडून वाहत आहेत. तर, काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांची रात्री चांगलीच तारांबळ उडाली.

भंडारा – रुख्मिणी नगर येथे अनेकांच्या घरात घुसले पावसाचे पाणी भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असुन रात्री पासुन जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर भंडारा शहरातील रुख्मिणी नगर येथे पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. तर रस्त्यावरून गुडघाभर पाणी साचलं आहे. दर पावसाळ्यात रुख्मिणी नगर येथे पाणी साचत असले तरी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्याआधी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्यांची चांगलीच नासाडी झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातही शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरूवात झालीय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्ते ओस बडले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी तुंबल्याची तक्रार देखील पुढे आली आहे. मुसळधार पाऊस पाहता नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आलीय. जिल्हाधिकारी कार्यालयाने सकाळी 8 वाजता सुटी जाहीर केली. परंतु, शनिवार असल्यामुळे अनेक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतात. त्यामुळे सुटी जाहीर होईपर्यंत सकाळी 6 ते 8 या वेळेत अनेक मुले शाळेत गेली होती. त्या सर्वांना पावसामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. दरम्यान वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून तेथे देखील शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत.

हवामान विभागाने राज्यातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. तर रत्नागिरी आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय.