देश

गुजरात सरकार मला त्रास देतेय खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव

अहमदाबाद – टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांनी गुजरात सरकारकडून आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेकडून अतिक्रमणाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर युसूफ पठाण यांनी हे आरोप केले आहेत. तसेच, याप्रकरणी युसूफ पठाण यांनी गुजरात उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे आता गुजरात उच्च न्यायालयात महापालिकेला नोटीस पाठवून याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती. याबाबत युसूफ पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २०१२ सालीच ही जागा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्याचे सांगितले. तसेच, २०१४ मध्ये महापालिकेने वेगळा प्रस्ताव आणून राज्य सरकारकडे पाठवला होता.याबाबत उच्च न्यायालयाने १० वर्षांपासून कोणतीच कारवाई का केली नाही, अशी विचारणा केली. यावर युसूफ पठाण म्हणाले की, मी नुकताच लोकसभा निवडणुकीत निवडून आलो असून, मी दुस-या पक्षातून निवडून आल्यामुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच, गेल्या १० वर्षांपासून काहीही केले नाही आणि अचानक निवडणूक निकालानंतर ६ जून रोजी नोटीस पाठवण्यात आली, असे युसूफ पठाण यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, महापालिकेच्या प्रस्तावानंतर तो पुन्हा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्याची गरज नव्हती, कारण ही जागा राज्य सरकारची नसून महापालिकेची आहे.